मंगळवेढा / मदार सय्यद
-----------------------------------
एकीकडे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतांना धनश्री परिवाराने राबविलेला हा नोकरी महोत्सव मंगळवेढा सारख्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले आहे.
इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या संकल्पनेतुन धनश्री परिवार वतीने भव्य युवा नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आमदार दत्तात्रय सावंत बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील हे होते. व्यासपीठावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, ऍड. बिराप्पा जाधव, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कदम, नगरसेवक अजित जगताप, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजीत कदम, शिवाजीराव पवार, जॉबशोकेसचे संचालक श्रीराम सातपुते, उद्योगपती दत्तात्रय बागल, ज्ञानदेव जवीर, राजाराम सावंत, नगरसेवक बशीर बागवान, प्रा. शोभाताई काळुंगे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. सावंत म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता उच्च शिक्षण घेऊन हजारो तरुण तरुणी नोकरी पासून वंचित राहिले आहेत. त्यांना योग्य दिशेने मार्गक्रमण व्हावे यासाठी हा जो धनश्री परिवाराने नोकरी महोत्सवाचा उपक्रम राबविला आहे . तो अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या राज्याची लोकसंख्या 12 कोटी 40 लाख असून शासनाकडून पगार घेणाऱ्या नोकरदारांची संख्या 20 लाख इतकी आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 1.61 इतके आहे. सन 2013 पासून 2016 पर्यंत एकही राज्यसेवाची जाहिरात निघाली नाही. 2017 साली ही जाहिरात निघाली त्यामध्ये ज्या लोकांनी प्रावीण्य मिळवले त्यांना आजून नोकरी मिळाली नाही. उच्च शिक्षण घेवुन पुणे सारख्या शहरात राहून सलग बारा - तेरा तास अभ्यास करून एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्यांना नोकरी मिळत नाही हे दुर्दैव आहे. परंतु धनश्री परिवार व जॉबशोकेसच्या माध्यमातून समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करून कार्पोरेट क्षेत्रात जायचे असेल तर शिस्तीचे बंधन असते. आणि ते बंधन आपल्या आयुष्याला वळण लावते. त्यातूनच आपल्याला मार्ग मिळतो. या मार्गातूनच आपली कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गक्रमण करावे. सध्या नोकऱ्या या दुर्मिळ आहेत या नोकरी महोत्सवातून मिळालेलली संधी न सोडता युवकांनी मार्गक्रमण करत राहवे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रकाश पाटील म्हणाले, देशात सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत असले तरी त्यावर टिका करीत बसण्यापेक्षा इच्छूकांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करून धनश्री परिवार व जॉबशोकेसने जो हा नोकरी महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे तो आत्मविश्वास फार प्रबळ असून इच्छूक तरुण आणि तरुणींनी चिकाटी न सोडता प्रयत्न सुरु ठेवावेत, त्यांना निश्चितच यश मिळेल, असा सल्लाही पाटील यांनी उपस्थित उमेदवारांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड केले तसेच प्रा. शिवाजीराव काळुंगे, ऍड. बिराप्पा जाधव, जॉबशोकेसचे संचालक श्रीराम सातपुते यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रभाकर कलुबर्मे, उमाशंकर कनशेट्टी, महादेव कोरे, दैनिक दामाजी एक्सप्रेस संपादक दिगंबर भगरे, डॉ. रविराज गायकवाड, अंकुश पडवळे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, बंडू पाटील, सोमनाथ गुळमिरे, राजेंद्र माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या नोकरी महोत्सवासाठी 1 हजार 700 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 1 हजार 24 उमेदवारांनी हजर राहून मुलाखत दिली. त्यापैकी 458 जणांची विविध कंपनीमध्ये जागेवरच निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. तर 378 जणांची मुलाखती होवून त्यांची नोंदणी निवड प्रकीयेच्या पुढील टप्प्यासाठी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर 750 युवकांना धनश्री जॉब कार्ड देण्यात आले. या जॉब कार्डच्या माध्यमातून युवकांना दररोज नोकरीतील संधींची माहिती एसएमएसद्वारे पुढील 365 दिवस पुरविली जाणार आहे.
सकाळी 11 वाजता सुरुवात होवून सायंकाळी 5 वाजेपर्यत अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हा नोकरी मेळावा पार पडला. या महोत्सवात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील 30 च्यावर मॅन्युफॅक्चरिंग, फार्मासी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग, टेलिकॉम, आयटी, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, सिक्युरिटी आदी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
हा नोकरी महोत्सव व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत व धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उल्हास जाधव यांनी केले.