आमदार प्रशांत परिचारक यांची धोबी (परीट )समाजाज्याला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 24, 2019

आमदार प्रशांत परिचारक यांची धोबी (परीट )समाजाज्याला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------


               कष्टकरी समाज म्हणून ओळख असणारा धोबी समाज सामाजिक, राजकीय व धार्मिक मागासलेला असल्यामुळे भारतातील 17 ते 18 राज्यात त्यांचा समाज अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे. मात्र एकाच देशात या समाजाचे दोन प्रवर्गामध्ये विभाजन झाल्याने त्यांचे मोठे नुकसान होत असून धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत सोलापूर जिल्हा परिट (धोबी) समाज संघटनेने आमदार प्रशांत परिचारक यांना भेटून मागणी केली होती. धोबी समाज महाराष्ट्रातील भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1960 पुर्वी अनुसूचित जातीमध्येच होता. सन 1936 ते 1960 पर्यत या जिल्ह्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळत होत्या. कारण भाषावर प्रांत रचनेपुर्वी विदर्भ (वर्‍हाड) हा मध्यप्रदेश राज्यात होता. मध्य प्रदेशातील वर्‍हाड (सध्याचा विदर्भ) मधील 5 जिल्हे (रायसेन, सिंहोर, भोपाळ, भंडारा, बुलढाणा) या जिल्ह्यात राहणारा धोबी समाज अनुसूचित जातीत होता. परंतु दि.1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पाच जिल्ह्यातील तीन जिल्हे मध्यप्रदेशात आणि दोन जिल्हे (भंडारा आणि बुलढाणा) महाराष्ट्रात जोडले आहेत. 

तसेच डॉ.डी.एम.भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुर्नविलोकन समितीची घोषणा होऊन दि.5 सप्टेंबर 2001 रोजी राज्य शासनाने डॉ.डी.एम.भांडे समिती गठीत केली. या समितीने आपला अहवाल दि.28 फेब्रुवारी 2002 रोजी शासनाकडे सादर करून हा समाज मागास वर्गाचे सर्व निकष पूर्ण करतो अशी महत्वपूर्ण शिफारस केली आहे. यामुळे कायद्यानुसार धोबी समाज अनुसूचित जातीत समाविष्ठ होऊ शकतो. 

धोबी समाज संघटनेने आमदार परिचारक यांना, डॉ.डी.एम.भांडे समितीचा अहवाल महाराष्ट्र राज्याच्या शिफारशीसह केंद्र शासनाला पाठवावा, श्रीसंत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानितक करावे, श्रीसंत गाडगेबाबा कर्मभुमिस श्रीक्षेत्र ऋणमोचन जि.अमरावती येथे स्मारक उभारून त्यास निधी द्यावा, श्रीसंत गाडगेबाबा यांचा 23 फेब्रुवारी हा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून शासनाने घोषित करावा आदी मागण्या करण्यात आल्या. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन या विषयावर चर्चा करून लेखी पत्रद्बारे मागणी केली. याबाबत मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मकता दर्शविली आहे.

आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे सोलापूर जिल्हा परिट (धोबी) समाज संघटना, सोलापूर चे संजय घोडके, दत्तात्रय क्षिरसागर, नामदेव वाघमारे, गणेश ननवरे, संतोष घोडके ,दयानंद पवार, विजय वाघमारे, दिगंबर गायकवाड, वैभव ननवरे, विजय वरपे, रामेश्‍वर साळुंखे, योगेश घोडके, विशाल घोडके, कैलास नवले, पिंटु गायकवाड, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सुनिल कारंडे, सतीश भोसले, कांतीलाल वरपे आदींनी निवेदन दिले.

Pages