मंगळवेढा / मदार सय्यद
----------------------------------
राज्यातील इतर मागासवर्गीयांसाठी सर्व जिल्हा ठिकाणी भाड्याने इमारती घेऊन चालू शैक्षणिक वर्षापासूनच वसतीगृहाची सोय करावी तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण तातडीने लागू करावे, अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने प्रांतकार्यालयाचे नायब तहसीलदार विजय जमादार साहेब यांना निवेदन देवून सरकारकडे मागणी केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी जिल्हा ठिकाणी वसतीगृह बांधण्यासाठी या वर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण या वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण होण्यास निश्चितच काही कालावधी लागणार आहे. शासनाने इतर मागास वर्गीय मुलांसाठी १२ तर मुलींच्या १८ वसतीगृहांना मंजूरी दिलेली आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह मंजूर केल्यानंतर त्याचवर्षी सुरुही करण्यात येते, त्याच धर्तीवर ओबीसींसाठीही चालु शैक्षणिक वर्षांपासूनच वसतीगृहांची सोय करावी. सर्व जिल्हा ठिकाणी भाड्याने इमारती घेऊन या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करावी, असे मत शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेने व्यक्त केले आहे.विशेष मागास प्रवर्गाच्या मेडीकल प्रवेशासंदर्भात निवेदन माहिती देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या प्रवर्गासाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. पण हे आरक्षण वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मेडीकलच्या प्रवेशासाठीही २ टक्के स्वतंत्र आरक्षणाचा लाभ लागू व्हावा यासाठी शासनाकडे वारंवार निवेदन देवून मागणी केली होती. २०१८ च्या हिवाळी अधिवेशानामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता पण विशेष मागास प्रवर्गाला मेडीकलमध्येही स्वतंत्र आरक्षण लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या आरक्षणाचा लाभ देण्यास विलंब करुन विशेष मागास प्रवर्गावर अन्याय केल्यासारखेच आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मेडीकलसाठी स्वतंत्र २ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली.प्रांतकार्यालयाचे नायब तहसीलदार यांना निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शिवबुध्दचे उपाध्यक्ष रघुनाथ पवार पाटील, शिवबुध्दचे कार्याध्यक्ष किरण शाह,सोलापूर जिल्हाध्यक्ष परमेश्वर डांगे, शिवबुध्दचे शहराध्यक्ष मंगेश क्षीरसागर, किरण शिंदे, बाळू बोरगावकर, सचिन शिंदे, यल्लप्पा दांडेकर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते