पंढरपूर / प्रतिनिधी
----------------------------
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व म्हैसाळ योजनेत मंगळवेढा तालुक्यातील आठ गावांचा नव्याने समावेश करण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. आषाढी वारीनिमित्त महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूर येथे आले होते. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्र्यांना शैला गोडसे यांनी निवेदन दिले.
मंगळवेढा तालुक्याच्या कायमस्वरूपी दुष्काळी भागासाठी 2014 साली मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली. मंजूर झाल्यापासून या योजनेला निधी अथवा सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या योजनेची मूळ प्रशासकीय मान्यता रद्द होण्याआधी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ निधीची उपलब्धता करून द्यावी. व तसेच मंगळवेढा तालुका हा म्हैसाळ योजनेचे शेवटचे टोक आहे. या योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील लवंगी, आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर (बु), सलगर (खु), येळगी गावांचा सीमेवरून जाते. पाण्याच्या एकेक थेंबासाठी तहानलेल्या गावांच्या सीमेवरून पाणी जात असून त्यांना जर ते मिळत नसेल तर त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे या आठ गावांचा नव्याने समावेश करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी. याआधी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जलसंधारण कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत या आठ गावांचा समावेश करण्याबाबत सहमती दर्शवली होती. तसा क्षेत्रीय पातळीवरून पुणे येथील कृष्णा खोरे महामंडळाला प्रस्तावही सादर झाला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यांचा विचार करून त्यावर सकारात्मक निर्णय घेत. संबंधित विभागाला तशा सुचना देण्याची मागणी शैला गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव विनोद कदम महिला आघाडी तालुका प्रमुख आरती बसंंवती उपस्थित होते.
-----------------------------------------------
जलसंधारण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब असतील, युवासेनाप्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे असतील, किंवा राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील ,जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच स्तरावर पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे
सौ शैला गोडसे जि. प. सदस्य