मसाप दामाजीनगरची महाराष्ट्रातली आदर्श शाखा :-डॉ.द.ता.भोसले - Pantnagari Times

Breaking News

Monday, July 8, 2019

मसाप दामाजीनगरची महाराष्ट्रातली आदर्श शाखा :-डॉ.द.ता.भोसले मंगळवेढ्यात होणार्‍या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाची बैठक उत्साहात


 मंगळवेढा / मदार सय्यद

-------------------------------------

 महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर ही महाराष्ट्रातील साहित्य परिषदेची अग्रगण्य आदर्श शाखा आहे. इथले अनेकविध उपक्रम व त्यांचे नियोजन  या गोष्टी याची साक्ष आहेत. या शाखेचे सातत्याने लेखन करणार्‍या विशेषतः महिलांची लक्षणीय  संख्या पाहता  या शाखेच्या नेतृत्वाने राबविलेल्या कल्पक उपक्रमांचे विशेष अभिनंदन करावे लागेल. असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द.ता.भोसले यांनी काढले. 


मसाप दामाजीनगर,अखिल भारतीय नाटय  परिषद,मंगळवेढा व सुरसंगम ग्रुपने 3 व 4 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन व  संगीत संमेलनाच्या पूर्व तयारी बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.बैठकीच्या प्रारंभी मसाप अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दोन दिवशीय साहित्य संमेलनाची संकल्पना आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केली. 

यावेळी अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी मंगळवेढयाची संपन्न साहित्य परंपरा सांगून हा महत्वकांक्षी उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. 

माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी राज्यस्तरीय संमेलनाचे नियोजन कसे करावे याचे तपशिलवार मार्गदर्शन करून साहित्य व नाटय क्षेत्रातील नामांकित मंडळी या उपक्रमात सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 

डॉ. शरद शिर्के यांनी कार्यक्रमातील वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे सांगून कार्यक्रमाच्या काटेकोर नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. 

नगराध्यक्षा अरूणा माळी यांनी आपण या मसाप शाखेच्या सक्रिय सभासद असल्याचे अभिमानाने नमूद करून संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

 या नियोजन बैठकीस मसाप पुणेचे खास प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले कल्याण शिंदे यांनी अल्पावधीत मसाप दामाजीनगर शाखेने राज्यस्तरीय संमेलनापर्यंत घेतलेली झेप केवळ वाखाणण्याजोगीच असून महिलांचे असे स्थानिक शाखेने संमेलन भरविण्याचा हा बहुदा पहिलाच अनोखा प्रयत्न असून मसाप पुणेच्या वतीने  सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

या दोन दिवशीय साहित्य संगीत संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण नगराध्यक्षा अरूणा माळी, डॉ.द.ता.भोसले व प्रा.लक्ष्मणराव ढोबळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे आकर्षक बोधचिन्ह बनविणारे ढगे डिजीटलचे लहू ढगे व अखिल काझी यांचा विशेष गौरव करण्यात आला. 

यावेळी झालेल्या चर्चेत सुरसंगमचे दिगंबर भगरे,प्रा.कल्पेश कांबळे,लहू ढगे,अजय देशपांडे, राजेंद्र घाडगे आदींनी संगीत संमेलनाबाबत मार्गदर्शन केले. 

सुत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले. तर अशपाक काझी यांनी आभार मानले.

यावेळी नाटय परिषद  राज्य नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी,माजी नगरसेवक महादेव जिरगे,ज्ञानदीप संस्कार भारतीचे अध्यक्ष संभाजी सलगर,प्रायमाचे प्राचार्य निलकंठ कुंभार,स्व.संजय सविता वाचनालयाचे 

 अध्यक्ष राकेश गायकवाड,माजी मुख्याध्यापिका निर्मला पट्टणशेट्टी, मंगळवेढा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन नवनाथ सावळे, दामाजीनगर ग्रा.पं. सदस्या वंदना तोडकरी,कृषीमित्र अजय अदाटे यांचेसह जर्नाधन नेने,चंद्रकांत पाटील,विठ्ठल मासाळ, संजय माने,रविंद्र लोकरे, अनिल गायकवाड,सुरेश माळी,संतोष गणगले, विनोद शिंदे,रेखा जडे, संगिता मासाळ, सुरेखा नाडगौडा, डॉ.राजेश्वरी महिमकर,प्रा.सुधा मांडवे,प्रा.लता माळी,सुषमा सुतार, दया वाकडे,रेश्मा गुंगे,विदया माने, भारती नागणे,सुनिता गणगले, कल्याणी कोळी आदी उपस्थित होते.

---

फोटो ओळी-मंगळवेढा येथे 3 व 4 ऑगष्ट रोजी होणार्‍या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले,माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,नगराध्यक्षा अरुणा माळी,कल्याण शिंदे,प्रकाश जडे,यतिराज वाकळे,अ‍ॅड.नंदकुमार पवार व इतर मान्यवर.

----

Pages