मंगळवेढा / मदार सय्यद
--------------------------------
साखर कारखान्याच्या कामाबरोबरच मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेवून विविध प्रश्नांवर चर्चा केली. याशिवाय शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भेट घेतली. सध्यातरी या विषयावर मी काही बोलणार नाही. आमदार भारत भालके यांनी सांगितले. माझ्या भाजप प्रवेशाच्या फक्त चर्चा आहेत. मी कोणताही निर्णय घेतला नाही. साखर कारखान्याच्या निमित्ताने आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे सांगत भाजप प्रवेशावर अधिक न बोलता, 'नो कॉमेंटस' अशी सावध प्रतिक्रिया आमदार भारत भालके यांनी दिली.
काँग्रेसचे आमदार भारत भालके भाजपात जाणार अशी मागील आठ दिवसांपासून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आज आमदार भालकेंनीक काँग्रेस बंडखोर आमदारांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
आज दिवसभर विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडयामध्ये आमदार भारत भालके काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती.या चर्चेचे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात पडसाद उमटले. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये आमदार भारत भालकेंच्या नावाची ही चर्चा सुरु आहे.
त्यातच आज आमदार भालके यांनी साखर कारखान्याच्या कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीनंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खरोखरच भालके भाजपात जाणार की, काँग्रेसमध्ये राहणार याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.