मंगळवेढा / मदार सय्यद
------------------------------
गेल्या वर्षी मंगळवेढा येथे झालेल्या रौप्य महोत्सवी पाणी संघर्ष चळवळीमुळे म्हैसाळचे पाणी हुन्नूर येथील ओढ्यात पोहचले. या यशाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थित कृष्णा खोऱ्यातील मंगळवेढा, सांगोला व जत या दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेची विभागीय पाणी संघर्ष परिषद शनिवार दि. ८ जून रोजी दुपारी १ वा. हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा तालुका पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील १३ कायम दुष्काळी तालुक्यांना म्हैसाळ टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, या हेतूने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी दि. ११ जुलै १९९३ रोजी आटपाडी येथे पहिली पाणी संघर्ष परिषद घेऊन या आंदोलनाला सुरूवात केली होती.
नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शेतमजूर, शेतकरी व कष्टकरी संघटना यांनी पाणी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून तीव्र लढा उभारल्यामुळेच राज्य शासनाला कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करणे भाग पडले होते. आजवर केलेल्या विविध आंदोलने व मोर्चांमुळेच या योजनेचे पाणी गत दोन वर्षात आटपाडी व सांगोला या शेवटच्या दोन तालुक्यात पोहोचले आहे. व तसेच गेल्या वर्षी मंगळवेढा येथे झालेल्या रौप्य महोत्सवी पाणी संघर्ष चळवळीमुळे म्हैसाळचे पाणी हुन्नूर येथील ओढ्यात पोहचले होते.
आता पुन्हा निर्णायक लढा उभारण्यासाठी या विभागीय पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन केले आहे. त्यात या योजनेच्या मुख्य व पोटकालव्यांची कामे अद्याप बाकी आहेत, त्यासाठी तात्काळ निधी देण्यात यावा, टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, तारळी, ताकारी, धोम बलकवडी, निरा व देवधर योजनेचे पाणी समन्यायी वापर पध्दतीने आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्व, पलूस, खटाव, खंडाळा व माण आदी दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळण्यासाठी, मंगळवेढा, सांगोला, जत व इतर दुष्काळी तालुक्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता, भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी, मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी उजनी उजवा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी, मंगळवेढा, सांगोला व जत तालुक्यातील म्हैसाळ ६ टप्प्यातील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी, शिरनांदगी, पडोळकरवाडी, लवंगी, भोसे, पारे, घेरडी, हंगीरगे व जवळा हे साठवण तलाव म्हैसाळ योजनेतून भरून द्यावीत, पौट साठवण तलाव लवकरात लवकर पूर्ण करून म्हैसाळचे पाणी त्यात भरून देणे, जनावरांसाठी सुरू केलेल्या छावण्यांच्या सर्व अटी शिथिल करून पुरेसा पाऊस पडून चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवाव्यात व छावणीतील मोठी जनावरे प्रत्येकी ११० रुपये व लहान जनावरे प्रत्येकी ५५ रुपये अनुदान द्यावे तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी एक किलो व लहान जनावरांसाठी प्रत्येकी अर्धा किलो पशुखाद्य उपलब्ध करून देणे व शेळ्या-मेंढ्या साठी छावणी सुरु करणे या मागण्यासह अन्य विविध प्रमुख मागण्या या विभागीय पाणी परिषदेत करण्यात येणार आहेत. आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या पाणी संघर्ष परिषदेस निमंत्रक वैभव नायकवडी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, डॉ. बाबूराव गुरव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, ऍड. सुभाष पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा.मारुती सावंत, भाई चंद्रकांत देशमुख, प्रा. दत्ताजीराव जाधव, ऍड. बाळासाहेब बागवान, नानासाहेब लिगाडे, बाळासाहेब केदार, ऍड. भारत पवार, ऍड. राहुल घुले, प्रा. समाधान क्षीरसागर आदी प्रमुख वक्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येने या विभागीय पाणी संघर्ष परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

