लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढून टाका;आता विधानसभेच्या तयारीला लागा:शरद पवार - Pantnagari Times

Breaking News

Sunday, June 2, 2019

लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढून टाका;आता विधानसभेच्या तयारीला लागा:शरद पवारमुंबई / मदार सय्यद

-------------------------


लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढून टाका, आपला पक्ष लोकांसमोर प्रभावीपणे कसा सामोरा जाईल याचा विचार करा आणि विधानसभेच्या तयारीला लागा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.

     आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शनिवारी घेतली. शरद पवार यांनी बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि भाजपवर जोरदार टीका केली. 'लोकांच्या जगण्यामरण्याच्या खऱ्या प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी धार्मिक उन्माद वाढविण्याचे काम लोकसभा निवडणुकीत केले', असा आरोप पवार यांनी केला. 

    'देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सर्व गोष्टींचा सरकारला फटका बसणार होता. पण पंतप्रधान मोदींनी सोयीस्कर आढावा घेत प्रचाराचे सूत्रच बदलले', असेही पवार म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभेला लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला. 

➤पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. 'ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते कायम राहील', असं पवार म्हणाले.

Pages