हुन्नूर येथे पार पडलेल्या विभागीय पाणी संघर्ष परिषदेचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर - Pantnagari Times

Breaking News

Friday, June 14, 2019

हुन्नूर येथे पार पडलेल्या विभागीय पाणी संघर्ष परिषदेचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
मंगळवेढा / मदार सय्यद

 

                  नुकतेच हुन्नूर येथे पार पडलेल्या विभागीय पाणी संघर्ष परिषदेत मंजूर करण्यात आलेले विविध ठराव जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

कृष्णा खोऱ्यातील मंगळवेढा, सांगोला व जत या दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेची विभागीय पाणी संघर्ष परिषद शनिवार दि. ८ जून रोजी हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे आमदार भाई गणपतराव देशमुख अध्यक्षतेखाली व शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. यादरम्यान एकूण १३ ठराव मंजूर करण्यात आले होते. या ठरावांची प्रत

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे गुरुवार दि.१३ जून रोजी मंगळवेढा तालुका पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्यासह मंगळवेढा तालुका पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक ऍड. भारत पवार, युवराज गडदे, ऍड. राहुल घुले, प्रा.समाधान क्षिरसागर आदी जणांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे मागणी केलेल्यानुसार ठराव शासनाच्या वरिष्ठ विभागाकडे पाठवून त्याची योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले.

या विभागीय पाणी संघर्ष परिषदे दरम्यान मंगळवेढा, सांगोला, जत व इतर दुष्काळी तालुक्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता, भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी, मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी उजनी उजवा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी, मंगळवेढा, सांगोला व जत तालुक्यातील म्हैसाळ ६ टप्प्यातील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी, शिरनांदगी, पडोळकरवाडी, लवंगी, भोसे, पारे, घेरडी, हंगीरगे व जवळा हे साठवण तलाव म्हैसाळ योजनेतून भरून द्यावीत, पौट साठवण तलाव लवकरात लवकर पूर्ण करून म्हैसाळचे पाणी त्यात भरून देणे, जनावरांसाठी सुरू केलेल्या छावण्यांच्या सर्व अटी शिथिल करून पुरेसा पाऊस पडून चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवाव्यात व छावणीतील मोठी जनावरे प्रत्येकी ११० रुपये व लहान जनावरे प्रत्येकी ५५ रुपये अनुदान द्यावे तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी एक किलो व लहान जनावरांसाठी प्रत्येकी अर्धा किलो पशुखाद्य उपलब्ध करून देणे व शेळ्या-मेंढ्या साठी छावणी सुरु करणे, मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांनी वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे भिमा नदीतील पाणी उजव्या कालव्यातून माण नदीवरील गुंजेगांव बंधाऱ्याच्याऐवजी बॅरेज बांधून पाणी साठविणे व तेथून उचलून त्या २४ गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी आवश्यक ते पाणी देण्यात यावे , असा प्रकल्प खास बाब म्हणून महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे . सदर प्रकल्प त्वरीत पूर्ण करण्यात यावा तसेच कासेगांव हद्दीतून जाणारा निरा उजवा फाटा हा उजनी उजव्या फाट्यावरून जातो . तेव्हा तेथे निरा उजव्या कालव्याला एस्केप देवून निरेच्या आलेल्या पुराचे पाणी उजनीच्या उजव्या कालव्यात टाकण्यात यावी त्याचबरोबर मंगळवेढा , पंढरपूर , मोहोळ तालुक्याला उजनी प्रकल्पाचे पाणी जमिनीला मिळणार म्हणून मंगळवेढा तालुका २१ गावातील १२५00 एकर पंढरपूर तालुका ३२ गावातील १३000 एकर व मोहोळ तालुक्यातील २७ गावे ७000 एकर जमीन कवडीमोल किंमतीने सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता संपादन केली . परंतु उजनीचे पाणी अद्यापपर्यत नियोजनाप्रमाणे लहान वितरिका व पोट चाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत काढलेल्या नसल्यामुळे बऱ्याच शेतजमिनीच्या भागाला पाणी मिळाले नाही . तरी या तिन्ही तालुक्यातील उजनीच्या अपूर्ण कामाला पुरेसा निधी देवून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत शेतचाऱ्या काढून त्वरीत त्यांच्या शेतीला पाणी देण्यात यावे , पौट साठवण तलाव २००७ साली मंजूर झाला आहे . तो काही शेतकऱ्यांनी तलावात जाणाऱ्या जमिनीला जादा मोबदला मिळावा किंवा पर्यायी जमीन मिळावी म्हणून काम थांबविले आहे . त्याच्या निधीची व्यवस्था करून तलाव पूर्ण करावा यासह इतर विविध ठराव मंजूर करण्यात आले होते.

Pages