मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
सिध्दापूर (ता. मंगळवेढा) येथे वारंटमधील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलिसांनी घरावर छापा टाकला असता घरामध्ये मोठया प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रे मिळून आली असून ही प्राणघातक हत्यारे पोलिसांनी जप्त करून राहूल जाफर पवार,जाफर बाळू पवार,शेखर जाफर पवार, (रा. सिध्दापूर ता. मंगळवेढा) समाधान रोहन काळे (रा.पारेवाडी ता.करमाळा) या चौघाविरूध्द भारतीय कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी,सिध्दापूर येथील स्टँडींग वॉरंट असलेला आरोपी जाफर बाळू पवार याला पकडण्यासाठी पोलिस प्रशासनाने दि.27 रोजी दुपारी 2.00 वा. आरोपीच्या निवासस्थानी छापा टाकण्याचे प्रयोजन केले होते. यावेळी पंढरपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अरूण सावंत, पोलिस निरिक्षक अनिल गाडे,सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश विधाते व इतर पोलिस कर्मचारी छापा टाकण्यासाठी सिध्दापूर येथे गेले असता पोलिसांना पाहताच सदर आरोपी पळून गेला.
पोलिसांनी सदर घरावर छापा टाकला असता त्या ठिकाणी राहूल जाफर पवार व समाधान काळे हे दोघे पोलिसांना मिळून आले. घराची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात वेगवेगळया प्रकारची धान्य ठेवलेल्या लोखंडी पेटीत दोन लोखंडी भाले,चार सत्तूर,दोन कोयते,एक तलवार,एक दांडपट्टा,12 सुरे,2 चाकू अशी हत्यारे मिळून आली. पोलिसांनी सर्व हत्यारे पंचासमक्ष जप्त केली. या घटनेची पोलिस नाईक विकास क्षिरसागर यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर वरील चौघांविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.