धनश्री परिवारातील आर्थिक संस्था महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील - प्रा.शोभाताई काळुंगे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, May 4, 2019

धनश्री परिवारातील आर्थिक संस्था महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील - प्रा.शोभाताई काळुंगेमंगळवेढा / प्रतिनिधी

 

शिक्षित आणि अल्पशिक्षित महिलांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचत गटांच्या चळवळीसाठी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेट मंगळवेढा या दोन्ही आर्थिक संस्था पुढील काळात महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. असे प्रतिपादन प्रा. शोभाताई काळुंगे यांनी केले आहे.

धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा नंदेश्वर या शाखेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त नंदेश्वर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा.शोभाताई काळुंगे बोलत होत्या. व्यासपीठावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नंदेश्वरचे शाखाधिकारी अन्सारी, माजी सरपंच वसंत गरंडे, गुरुलिंग दोलतडे, आबा पाटील, विठ्ठल काळुंगे, भारत बंडगर, मोहन कांबळे, प्रकाश मेटकरी, महादेव क्षिरसागर, राणी उन्हाळे, सुवर्णा ढगे आदीजण उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.शोभाताई काळुंगे म्हणाल्या, धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेट या दोन्ही संस्थने ठेवीदारांच्या विश्वासाच्या जोरावर जवळपास पाचशे कोटी पर्यंत टप्पा गाठला आहे. बँकेत नुसती ठेव स्वीकारून चालत नाही तर आलेले ठेव कर्जाच्या स्वरूपात वाटप करावे लागते. आणि या कर्जाच्या मिळालेल्या व्याजातून ठेवीदारांना व्याज द्यावे लागते. यासाठी कर्जदारच चांगला मिळावा लागतो. महिलांना त्यांच्या जीवनात खूप संघर्ष करावा लागतो चूल आणि मूल सांभाळत महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते. महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर

पुरुषापेक्षा महिला या आर्थिक व्यवहार चोखपणे बजावत असतात. म्हणून या दोन्ही आर्थिक संस्थेने महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात सुरुवात केली आहे. कमीत कमी सहा महिला व जास्तीत जास्त दहा महिलांना एकत्रित करून एक गट स्थापन करून प्रत्येक महिलेला पंचवीस हजार रुपये कर्ज वाटप केले जाणार आहे. त्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच रोजगार निर्मिती करून महिलांचे सक्षमीकरण करण्यास बचत गट पूरक ठरतील. 

महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ बनली आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली. स्वयंसहायता बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्याचा उद्देश ठेवून धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा महत्वाचा पुढाकार राहणार आहे. 

बचतगटाच्या माध्यामातून एकत्रित आलेल्या महिलांना शेती व शेतीपूरक उद्योग, कुटीर उद्योग, सामूहिक शेती, कुक्कुटपालन, शेळी व म्हैस पालन, मळणीयंत्र, शेती यांत्रिकीकरण उपकरणे, गारमेंट्स, पार्लर, नर्सरी, कॉम्प्युटर लॅब, घरगुती पदार्थ आदी अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी अर्थपुरवठा करुन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यास मदत होईल. अशा बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योगाबरोबर अनेक महिलांना घरबसल्या रोजगार निर्माण आहे. त्यातून महिला या नक्कीच समृद्ध बनतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. शिवाजीराव काळुंगे बोलताना म्हणाले बांगलादेशासारख्या गरीब राष्ट्रामध्ये प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी महिला बचत गट स्थापन करून ग्रामीण बँकेच्या माध्यमातून महिलांना रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. तिथे यशस्वी झालेली बचत गटांची संकल्पना 1990 नंतर हळूहळू भारतातही आली. महिलांचे सक्षमीकरण होऊन अर्थातच गरिबीचे निर्मूलन व्हावे, असा व्यापक उद्देश घेऊन या बचत गट चळवळीला सुरुवात झाली. त्या निमित्ताने चूल, मूल आणि शेतीच्या पलीकडे विश्व नसणा-या या महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली. 

शेतीच्या उत्पन्नातून किंवा कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायातून मिळणारा पैसा घरात खर्च होत असला तरी घरच्या बाईच्या हातात तो नसायचा. तिला तिच्या मर्जीप्रमाणे पैसे खर्च करणे किंवा कुटुंबाच्या कमाईला हातभार लावणे शक्य होत नसे. बचत गटांच्या माध्यमातून पैसा थेट तिच्या हातात गेला. पुरुषांपेक्षा स्त्रिया उत्तम व्यवस्थापक असल्याने त्याचे योग्य नियोजन करून स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना एक पर्याय खुला झाला. त्यातूनच खूप मेहनतीने खाद्यपदार्थ, उदबत्त्या, मेणबत्त्या, फराळ, मसाले असे विविध उद्योग महिलांनी उभे करून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गरीब परिस्थितीतून येऊन बचत गटांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या महिलांच्या यशस्वी कहाण्या खूप सांगता येतील. 

मात्र गेली 20 वर्षे ही चळवळ ज्या पद्धतीने पसरायला हवी होती आणि तिचा उद्देश सफल व्हायला हवा होता, तसा झालेला नाही. बचत गटांमुळे गरिबी निर्मूलनही झालेले नाही. किंबहुना राष्ट्रीय बँकांची आडमुठी धोरणे, बचत गटांना सरकारची मदत नसणे, मायक्रो फायनान्स संस्थांचे कर्जाचे अव्वाच्या सव्वा दर अशा विविध कारणांमुळे महिला बचत गटांच्या या चळवळीला घरघर लागल्याचे दिसते.  यासाठीच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योगासाठी भांडवल उभे करण्यासाठी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेट या दोन्ही संस्था कमी व्याजदरांमध्ये अर्थ पुरवठा करून महिलांना उद्योग विश्वात प्रोत्साहन देण्यासाठी या धनश्री परिवारातील दोन्ही आर्थिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. याचा फायदा महिलांनी करून घ्यावा व स्वयंपूर्ण होऊन आपले जीवन समृद्ध व आत्मनिर्भर करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी धनश्री महिला पतसंस्थेचे पाटखळचे शाखाधिकारी सुहास सावंजी, ज्ञानेश्वर फटे, ब्रह्मदेव कुंभार, तानाजी सूर्यवंशी, किरण मेहेरकर, राजू सूर्यवंशी, विक्रम जगताप, समाधान जाधव, ज्योतीराम सावंत, दत्तात्रय जाधव, चंदन खांडेकर, आण्णा गरंडे यांचेसह नंदेश्वर, पाटखळ, भोसे, हुन्नूर, रड्डे, गोणेवाडी, शिरशी व वाणीचिंचाळे आदी परिसरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कवी इंद्रजीत घुले यांनी केले.

Pages