मुक्कामी थांबा :तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना नियुक्तीच्या ठिकाणीच रहाण्याचे आदेश.! - Pantnagari Times

Breaking News

Sunday, May 5, 2019

मुक्कामी थांबा :तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना नियुक्तीच्या ठिकाणीच रहाण्याचे आदेश.!
मुक्कामी थांबा :तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना नियुक्तीच्या ठिकाणीच रहाण्याचे आदेश.!

मंगळवेढा / प्रतिनिधी

सरकारी योजना सुलभतेने आणि गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी नियुक्तीच्या ठिकाणी मुक्कामी रहावे अशा सक्त सूचना संबंधितांना देण्यात येत आहेत. या सूचनेची १ मे पासून जिल्ह्यात कडक  अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना असो अथवा दुष्काळी अनुदानाचे वाटप, लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे आणि त्या माहितीच्या आधारे संबंधितांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकचे मंडल अधिकारी बजावत असतात. या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयात थांबून आवश्यक ती माहिती वेळेत संकलित करून ती जिल्हा प्रशासनाला कळविणे गरजेचे असते. परंतु, हे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांच्याकडे अपडेट माहिती उपलब्ध होण्यास बर्‍याच अडचणी येतात. त्यामुळे लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यातच वेळ जातो. परिणामी संबंधित शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळू शकत नाही.

शेतकऱ्यांची हीच गैरसोय टाळण्यासाठी त्यांचे काम अधिक गतिमान पद्धतीने होण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी मुक्कामी राहणे अपेक्षित आहे. किंबहुना त्यांची नियुक्ती त्या निकषासाठी  झालेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी १ मे पासून त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी मुक्कामी राहावे अशा सूचना त्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मंडलाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मुक्कामी राहावे, अशा सूचना त्यांना देण्यात दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. १ मे नंतरील सुट्ट्या वगळता सोमवार दि. ६ मे पासून तरी मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याचे आदेश दिले आहेत.साधारण प्रत्येक तलाठ्याकडे २ हजार शेतकरी खातेदार आहेत. प्रत्येक तलाठ्याने त्याच्याकडील खातेदारांची माहिती त्यांच्या नोंदवहीत माहिती संकलित करून, ती नोंदवही सातत्याने अपडेट करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना वेळेत देता येईल. शिवाय कामाची पद्धतही गतिमान होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

Pages