रिंकू राजगुरू टेंभुर्णी केंद्रात सर्वप्रथम - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, May 28, 2019

रिंकू राजगुरू टेंभुर्णी केंद्रात सर्वप्रथम बारावी परीक्षेत आर्चीचे ‘सैराट’ यश 


सोलापूर / प्रतिनिधी

----------------------------‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू उर्फ प्रेरणा महादेव राजगुरू ही कला शाखेतून बारावीची परीक्षा 82 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने टेंभुर्णीतील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली होती. ती टेंभुर्णी केंद्रात सर्वप्रथम आल्याने तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिने कला शाखेतून टेंभुर्णीतील जय तुळजाभवानी कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तिला इंग्रजी विषयात 54, मराठी : 88, इतिहास : 86, भूगोल : 98, पॉलिटिकल सायन्स : 83, अर्थशास्त्र : 77 व पर्यावरण विषयामध्ये 49 याप्रमाणे तिला एकूण 650 पैकी 533 मार्क मिळाले आहेत.

आर्ची उर्फ रिंकू राजगुरू ही टेंभुर्णीत 12 वीच्या परीक्षेस येणार असल्याचे समजताच विद्यार्थ्यांसह चाहत्यांनी तिला पहाण्यासाठी विद्यालयात मोठी गर्दी केली होती. 21 फेब्रुवारी 2019 पासून बारावीची परीक्षा सुरू होती. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक कैलास सातपुते, महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी  तिचे अभिनंदन केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचा ‘सैराट’ नंतर ‘कागर’ हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रसारित झाला. नागराज मंजुळे दिग्दर्शित व अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूमिका असलेल्या ‘झुंड’ या हिंदी चित्रपटाचे  चित्रिकरण सुरु आहे. तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेकअप’ चित्रपटाचेही चित्रिकरण सध्‍या सुरू आहे.

रिंकूने चित्रपटांमध्ये काम करीत असतानाच अत्यंत चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. रिंकू यापुढील शिक्षण सुरू ठेवणार आहे.

                                                                             - महादेव राजगुरू, रिंकूचे वडील

Pages