मंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 10, 2019

मंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारीमंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी

  

जळगाव प्रतिनिधी

-------------------------
 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भारतीय जनता पक्षामधील जळगाव जिल्ह्यामधील अंतर्गत यादवी समोर आली. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी. एस. पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्टेजकडे धावून आलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी हात उगारला. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भारतीय जनता पक्षाकडून सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळीच भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी. एस. पाटील यांना जबर मारहाण केली.

यावेळी स्वतः वाघ पाटील यांना लाथा मारताना दिसून येत होते. माजी आमदार बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. पक्षातंर्गत गटबाजी आणि नाराजीनाट्यातून ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. 

कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही झटापट झाली. पोलीसही खाली पडले. गिरिश महाजन यांनी कार्यकर्त्यांना नियंत्रित करताना कार्यकर्त्यांना ढकलले. स्वतः गिरीश महाजन यांच्यावर कार्यकर्त्यांना खाली ढकलण्याची नामुष्की आली.

जळगावातील भाजपमधील खदखद काही दिवसांपूर्वीच समोर आली. काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही आपला उमेदवार बदलला. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदय वाघ स्मिता वाघ यांचे पती आहेत. 

काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने 3 एप्रिलला उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Pages