ब्रम्हपुरी येथे महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी धनश्री परिवार पुढाकार घेणार - Pantnagari Times

Breaking News

Friday, March 8, 2019

ब्रम्हपुरी येथे महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी धनश्री परिवार पुढाकार घेणारमराठ्यांच्या इतिहासात प्रकाशमान झालेली दुसरी राजस्त्री म्हणजे महाराणी येसूबाई

ब्रम्हपुरी येथे महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी धनश्री परिवार पुढाकार घेणार

-------------------------

मंगळवेढा / प्रतिनिधी

 मराठ्यांच्या इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली दुसरी राजस्त्री म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी महाराणी येसूबाई या आहेत. असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक सरोजिनी चव्हाण यांनी केले आहे.

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराणी येसुबाईंचे कर्तत्व या विषयावर व्याख्यान देताना सरोजिनी चव्हाण बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. मीनाक्षीताई कदम या होत्या. सुरुवातीला माँ जिजाऊ व महाराणी येसूबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन सरोजिनी चव्हाण, डॉ. मीनाक्षीताई कदम, निर्मला पट्टणशेट्टी, प्रा. शोभाताई काळुंगे, डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.


पुढे बोलताना सरोजिनी चव्हाण म्हणाल्या, छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द संकटांची मालिकाच असलेली राजवट होती. शिवछत्रपतींच्या निधनानंतर स्वराज्यातील प्रधानांनी केलेला स्वामीद्रोह, पुढे विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न या घटनांमुळेच छत्रपती संभाजी महाराजांचा स्वकीयांवरील विश्वासच उडाला होता. अशातच दिल्लीपती औरंगजेबाने स्वराज्याची स्वारी केली. या संकटाचा फायदा घेऊन पश्चिम किनाऱ्यावरील सिद्धी व पोर्तुगीज स्वराज्याच्या जीवावर उठले. अशा परिस्थितीत संभाजी महाराजांच्या सुखदुःखात सहभागी होणारी एकच व्यक्ती ही म्हणजे महाराणी येसूबाई या होत.

कोकणातील शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्के यांची कन्या खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची निवड आपली सून म्हणून केली. या निवडीच्या कसोटीस त्या पुरेपूर उतरल्या. रात्रंदिवस युद्धांच्या प्रसंगात गुंतलेल्या स्वराज यांच्या अंतर्गत कारभारात पतीच्या बरोबरीने त्यांनी आपला भार उचलला स्वतः संभाजी महाराजांनी त्यांना "श्री सखी राज्ञी जयाति" असा शिक्का बहाल करून शिक्के कट्यारीचे पद दिले होते.पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्रभर गरुड भरारी मारणाऱ्या संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयतिक दुःख बाजुला सारून मोठ्या निर्धाराने सामोरे गेल्या. राजाराम महाराज व संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून राजारामाना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा, असे त्यांनी सुचवले. स्वतः येसूबाई रायगड लढायला लागल्या. पण शेवटी रायगड लढने शक्य नाही हे पाहिल्यावर त्यांनी मोगलांच्या छावनीत स्वतःच्या ७-८ वर्षांच्या मुलासह प्रवेश केला.

आयुष्यातील उमेदिची ३० वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली. त्यात अनेक अडचणी आल्या. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या. त्यांच्या ह्या आत्मबलिदानाला तोड़ नाही. सतत ३० वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंगजेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम जपला.

त्या दिल्लीहून दक्षिनेत परत आल्या. दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा, कोल्हापुर अशी शकले पाहिली. यानंतर थोडेच दिवसांत त्यांचे देहवासन झाले. त्याचा उल्लेख कोल्हापुरच्या संभाजी यांच्या पत्रावारून कळतो. साताऱ्याजवळील माहुली या क्षेत्री त्यांचे दहन करण्यात आले. आजही माहुलीच्या नदीकाठी एका चौथार्यावर त्यांची समाधी दाखवतात.

आपल्या सगळ्यांचे दुर्दैव असे कि आपल्या सर्वस्वाचा त्याग करत स्वराज्यापायी आणि रयतेसाठी अनंत अन्यास सहन करणाऱ्या ह्या महान महाराणीचा इतिहास आपण जागता ठेवू शकलो नाही.

ह्या महान महाराणीची जन्मतारीख इतिहास विसरून गेला तो गेलाच परंतु त्यांच्या निधनाची तारीख सुद्धा लक्षात ठेवण्याची कोशिश इतिहासाने घेतली नाही.

इतिहासात अजुन त्यांच्या जन्माची नोंद नाही, मृत्यूची दाद नाही. त्यांच्या कर्तुत्वाची, ऐतिहासिक योगदानाची माहिती नाही. मंगळवेढा पासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ब्रह्मपुरी याठिकाणी महाराणी येसूबाई मोगलांच्या छावणीत ४ वर्षे कैदेत होत्या त्यांचे ब्रह्मपुरीला पाय लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांचे स्मरण करण्या करिता या ठिकाणी त्यांचे एक स्मारक व्हावे असे चव्हाण यावेळी मागणी केली. हे स्मारक होण्यासाठी आपण पुरातत्व विभाग व ऐतिहासिक संदर्भात सर्व माहिती पुरवू असे त्यांनी सांगितले. त्यावेळी धनश्री परिवाराने या मागणीचे स्वागत करत या स्मारकासाठी लागेल तेवढी मदत करू असे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी यावेळी जाहीर केले. 

याप्रसंगी प्रा शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवाहरलालचे माजी मुख्याध्यापक सिद्राम यादव, भुजंगराव पाटील, जेष्ठ विचारवंत मनोहरपंत धोंगडे, बी.टी पाटील, मनोहर कलुबर्मे, विजय शिंदे, त्रिंबक कोंडूभैरी, ॲड. बिराप्पा जाधव, शिवाजीराव पवार, युवराज गडदे, ॲड.रमेश जोशी, एन. टी घुले, बाबुभाई मकानदार, हजरत काझी, श्रीरंग काटे, शिवाजी सातपुते, राजेंद्र सुरवसे, भारत निकम, प्रकाश काळुंगे, विजय गायकवाड, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह इतर मान्यवर तसेच धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इंद्रजीत घुले यांनी केले.

Pages