भाजपने उमेदवारी दिल्यास माढ्यातून लढणार : विजयसिंह मोहिते-पाटील - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, March 27, 2019

भाजपने उमेदवारी दिल्यास माढ्यातून लढणार : विजयसिंह मोहिते-पाटील



भाजपने उमेदवारी दिल्यास माढ्यातून लढणार : विजयसिंह मोहिते-पाटील


माढा / प्रतिनिधी

-------------------------

माढा लोकसभा मतदार संघात दिवसेंदिवस नाट्यमोड घडामोडी घडत आहेत. या नाट्यमोड घडामोडीमुळे माढा लोकसभा मतदार संघात सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज पुन्हा एकदा बॉम्ब फोडला आहे. भाजपने पक्षादेश दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी लागेल, असे सांगत अप्रत्यक्षरित्या माढ्यातून भाजपाकडून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले. ते माढा येथे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या घरी भेट देण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते.माढा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीतील उमेदवारीचा तिढा संपला असला तरी भाजपच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटला नाही. तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. जो भाजपात प्रवेश करेल त्याच्या नावाचीच दोन दिवस उमेदवार म्हणून चर्चा रंगत आहे. त्यामुळे दररोज नवनवी नावे समोर येत आहेत. 

माढा लोकसभेसाठी भाजपकडून सुभाष देशमुख यांच्या नावाबरोबरच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावांची चर्चा होत होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार असतील असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र आज सकाळपासून पुन्हा मोहिते पाटील पिता पुत्राच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

खा. विजयसिंह मोहिते पाटील हे माढा येथे माजी आ. धनाजीराव साठे यांच्या भावाच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना माढा लोकसभा तुम्ही लढण्यास इच्छूक आहात का? असे विचारले असता पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढण्यास तयार आहे. अद्यापही तुम्ही भाजपात प्रवेश केला नाही असे विचारताच त्यांनी स्मितहास्य करत उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये प्रवेश करणार की असे उत्तर दिले.भाजपकडून मोहिते पाटील पितापुत्रापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. खा. विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या सूचक इशाऱ्यानंतर भाजपात सामील असलेले मोहिते पाटील विरोधी नेत्यांची भूमिका काय राहील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Pages