जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सुशीलकुमार शिंदेंचा अर्ज दाखल
सोलापूर / प्रतिनिधी
हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (सोमवारी, ता. 25) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदाची निवडणूक हे युद्ध असून, हुकुमशाहीला नेस्तनाबूत करावे, असे आवाहन सुशील कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. सोमवारी सकाळी अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर पदयात्रेस सुरवात झाली. काँग्रेसचा तिंरगा, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचा निळा, तेलगु देशमचा पिवळा या रंगाच्या झेंड्यांनी परिसर गजबजून गेला होता. जोडीला बॅंजो, हालगीचा कडकडाटही होता. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅंजोच्या तालावर फेर धरला.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगभर तिरंग्याची वेशभूषा केली होती. पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देशम, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बहुरुपीनगरमधील कलाकारांनी श्रीराम, सीता आणि हनुमानाची वेशभूषा केली होती. तर वैदू समाजातील महिला कंगवा, बिबे विक्रीच्या साहित्यासह पदयात्रेत सहभाग नोंदविला.
सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला, कन्या आमदार प्रणिती व स्मृतीही पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. याशिवाय लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. अर्ज दाखल झाल्यानंतर काँग्रेसभवन येथे सभा झाली. 'नरेंद्र मोदी देशात हुकुमशाही आणत आहेत. ही निवडणूक नसून युद्ध आहे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही या युद्धात सोलापूरकरांना हुकुमशाहीला नेस्तनाबूत करायचे आहे,' असे सुशील कुमार शिंदे म्हणाले.
देशाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशाला मजबूत करण्यासह देशाचे अस्तित्व टिकवण्याचे काम फक्त काँग्रेसच करू शकतो. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असे या निवडणुकीचे स्वरुप आहे.
- प्रणिती शिंदे, आमदार