मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन -भीमा स्थिरीकरणाबाबत संजय शिंदेंकडून दिशाभूल - शैला गोडसे - Pantnagari Times

Breaking News

Thursday, March 28, 2019

मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन -भीमा स्थिरीकरणाबाबत संजय शिंदेंकडून दिशाभूल - शैला गोडसे
मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन -भीमा स्थिरीकरणाबाबत संजय शिंदेंकडून दिशाभूल शैला गोडसे 

  पंढरपूर / प्रतिनिधी

हजारो कोटींच्या मेट्रो, नदीजोड प्रकल्प, महामार्ग मार्गी लागत असतील तर स्थिरीकरण का नाही, विरोधकांनी ना चा पाडा बंद करावा

पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेबाबत मार्गदर्शन करताना शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे. यावेळी महावीर देशमुख, विनोद कदम, आरती बसवंती आदी उपस्थित होते.  

 माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही योजना पुढील तीन पिढ्या होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा उल्लेख करीत ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. हजारो कोटी रूपये खर्च करून मेट्रो, नदीजोड प्रकल्प, महामार्गासारख्या योजना पूर्ण होत असतील तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना का शक्य नाही, असा प्रश्न शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे  यांनी उपस्थित करत प्रबळ इच्छाशक्ती असल्यास ही योजना नक्की पूर्ण होईल व याचा सर्वाधिक लाभ सोलापूर जिल्ह्याला होईल, असे सांगितले. मात्र विरोधकांनी ही  योजना होणार नाही असा ना चा पाढा वाचणे बंद करून योजनेबाबत सकारात्मकता दर्शविली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे  उमेदवार संजय शिंदे यांनी ऐनवेळी  राष्ट्रवादीने  उमेदवारी घेताना कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही न होणारी योजना आहे. नेत्यांचे स्थिरीकरण झाले. मात्र हेच नेते स्थिरीकरणाचे राजकारण करत असल्याची टिका विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर केली होती. यावर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन संजय शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत पुढील तीन पिढ्या ही योजना अशक्य असल्याचा हवालाही दिला होता. मात्र सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपा आघाडीचे सरकार हे हजारो कोटी रूपये खर्च करून नदीजोड प्रकल्प, हजारो कोटींच्या मेट्रो, भुयारी मार्ग, समृध्दी महामार्गासाठी ५० हजार कोटींपेक्षा जास्त आराखडा असलेली योजना पूर्ण करीत असेल तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसारख्या शेतकऱ्यांच्या फायद्याची असणाऱ्या योजनेकडे हे सरकार दुर्लक्ष करणार नाही, हा आपणाला विश्वास असून येत्या काळात याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा व्यक्त केली.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करावयाची असेल तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेशिवाय जिल्ह्याला पर्याय नाही. टाटाच्या धरणाचे पाणी उजनी धरणात आणण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कणखर नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला सन २००४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार होते. मात्र त्यानंतर २०१४ पर्यंत म्हणजे १० वर्षे कॉँग्रेस आघाडी सरकारने केवळ मोहिते-पाटलांचे खच्चीकरण करण्यासाठी या योजनेला जाणिवपुर्वक बगल दिली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना पाण्यावाचून वंचित राहावे लागले आहे.

सन २००४ साली या योजनेची किंमत ५ हजार कोटी होती. आता या योजनेसाठी तब्बल २० हजार कोटींपेक्षा जास्त निधीची गरज आहे. मात्र एवढा निधी कोठून उपलब्ध करायचा, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करत योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न न करता ती होऊ नये, यासाठी सर्वाधिक प्रयत्न होताना दिसत आहेत. ही बाब निंदणीय असून या योजनेला टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिल्यास लाखो लोकांची तहान भागविली जाईल, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. लाखो लोकांना रोजगार मिळेल, दुष्काळाची तीव्रता कमी होईल, शहरांकडे जाणारे बेरोजगारांचे लोंढे थांबतील, हे मात्र विरोधकांकडून जाणीवपुर्वक सांगितले जात नाही. यासाठी आपण स्वत: कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी कायमस्वरूपी लढा उभारत असून त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत, खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे शैला गोडसे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर देशमुख, महिला आघाडीच्या तालुका संघटक आरती बसवंती, विनोद कदम आदी उपस्थित होते.

माढा तालुक्याला उजनी व बोगद्यामुळे स्थिरीकरणाचे महत्त्व कळेना......

तत्कालीन युती सरकारच्या काळात माढा उपसा सिंचन योजना मार्गी लागली होती. शिवाय उजनी धरणाचा सर्वाधिक फायदा माढा तालुक्याला होत असल्याने राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंना कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही फारशी महत्त्वाची वाटत नाही. मात्र त्यांनी त्यांच्या तालुक्याचे राजकारण करताना जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यां चाही विचार केला पाहिजे. ही योजना पूर्ण झाल्यास मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, पंढरपूरसह सांगोला जिल्ह्यातील सवर्रास तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात याचा लाभ होणार आहे. त्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे शैला गोडसे यांनी सांगितले.

हजारो कोटींच्या योजनांसाठी निधी; मग शेतकऱ्याच्या योजनेसाठी का नाही.....

सध्याच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये वाळवंटाचे नंदनवन करण्यासाठी नर्मदा नदीचे पाणी शेकडो कि.मी. अंतराचे कालवे काढण्यासाठी हजारो कोटी रूपये उपलब्ध होऊ शकतात. ५० कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग असलेल्या महाकाय अशा मुंबई मेट्रोसाठी २५ हजार कोटी रूपये उपलब्ध होऊ शकतात. जगामध्ये अशक्य वाटणाºया कोकण रेल्वेचे काम पूर्ण करण्यासाठी हजारो कोटी रूपये उपलब्ध झालेच. मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ५० हजार कोटी रूपये उपलब्ध होतात. केंद्र सरकारकडून १० हजार कि.मी.पेक्षा जास्त रस्त्यांसांक्ष ११० हजार कोटी, सन २०१७-१८ मध्ये तर २०१८-१९ साठी १२० हजार कोटी रूपये उपलब्ध करून कामे सुरू आहेत. मग शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण  योजनेसाठी अवघे २० हजार कोटी रूपये कसे काय उपलब्ध होऊ शकत नाहीत, असा सवाल शैला गोडसे यांनी उपस्थित करत राजकीय इच्छाशक्ती असल्यास ही योजना नक्की मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pages