मोहिते-पाटील यांचा मान-सन्मान कमी होऊ देणार नाही : मुख्यमंत्री - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, March 20, 2019

मोहिते-पाटील यांचा मान-सन्मान कमी होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
मोहिते-पाटील यांचा मान-सन्मान कमी होऊ देणार नाही : मुख्यमंत्री


 मुंबई / प्रतिनिधी

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने रणजितसिंह भाजपमध्ये आले आहेत. पुढची चर्चा आम्ही त्यांच्याशीच करणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 मोहिते-पाटील घराण्याचा मान सन्मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही, या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या आहेत. मोहिते-पाटील घराण्याशिवाय  महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. त्या कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज भाजपमध्ये येत आहेत हे महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज (बुधवार) काढले.

मुंबई येथील वानखेडे स्टेडियममधील गरवारे हॉलमध्ये माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या परिवारातील अनेक सदस्य आणि राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचे सवंगडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, विनोद तावडे, सदाभाऊ खोत, पक्षाचे सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी, माढा मतदार संघाचे निरीक्षक अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, चिटणीस राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश सोहळा आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पार पडला.शिवरत्न बंगल्यावर अकलूज येथे काल मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील  मोहिते-पाटील समर्थकांचा राष्ट्रवादी पक्ष सोडायचा का? भाजपमध्ये प्रवेश करायचा का? या विषयावर घमासान चर्चा झाली होती. यामधून सर्वांनी एकमताने भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मोहिते-पाटील कुटुंबीयांना आव्हान केले होते. त्यानुसार आजचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते तसेच राज्यातील रणजितसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाचे त्यांचे सहकारी आज भाजप प्रवेशावेळी मुंबई मध्ये  आवर्जून हजर होते. 

शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सकाळपासून प्रवेश सोहळ्याचे नियोजन केले होते. अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित कार्यकर्त्यांची सोय पाहिली. प्रारंभी धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील शिवतेज मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत, शहाजी पवार, अविनाश कोळी ,राजकुमार पाटील, अशोक निंबर्गी, अविनाश महागावकर, सचिन कल्याण शेट्टी, रघुनाथ कुलकर्णी आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील, अर्जुनसिंह, सत्यप्रभादेवी, सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, 14 पंचायत समिती सदस्य व राज्यांमधून  आलेल्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते भाजपचा झेंडा व कमळाची पट्टी गळ्यात घालून पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून माध्यमातून ही चर्चा ऐकायला मिळत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांची व माझी 14 वर्षापासूनची मैञी आहे. ते मोहिते पाटील कुटूंबाकडे आपुलकीने पाहतात. त्याच्या नेतृत्वाखाली राज्यांची प्रगती सुरू आहे. गट तट, पक्ष बाजूला ठेऊन ते सर्वांची कामे करतात. लोणंद पंढरपुर 100 वर्ष प्रलंबित रेल्वे मार्ग, पासपोर्ट कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग  आदी कामे त्यांनी वेगाने पूर्ण केली व करत  आहेत. कुर्डवाडी रेल्वे वर्कशाॅप साठी निधी उभा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकार शेवटच्या माणसांपर्यंत विकास झाला पाहिजे असा प्रयत्न करत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वेळोवेळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजने मधून 6 जिल्हे, 31 तालुक्यातील 12 लाख  एकर शेती बागायती होणार आहे. त्यांचा लाभ 2 कोटी जनतेला होणार आहे. आज पाण्याअभावी स्थलांतर होत आहे.

शहरीकरणांचा प्रश्न वाढत आहे. मागील सरकारने सत्ता असूनही या प्रकल्पांची चेष्टा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील राजकारण व समाजकारण भाजप सोबत करणार आहोत. आपणच आमच्या भागातील प्रश्न सोडवू शकता असा विश्वास आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण पक्षात प्रवेश केला आहे. आपला सन्मान राखला जाईल. कर्तृत्व, क्षमता पाहून काम दिले जाईल. भाजपने चढउतार पाहिले आहेत. देशात व राज्यांत भाजप एक नंबरचा पक्ष आहे. येणाऱ्या निवडणूकीत 45  खासदार विजयी होतील  असा विश्वास आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण मोहिते पाटील घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी राज्याला दिशा दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. गेली 15 वर्षे रणजितसिंह राज्यांच्या राजकारणात आहेत. एकञ काम करून सिंचनाचा प्रश्न मार्गी लाऊ. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेमुळे अनेक तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत. गेल्या 40 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी केंद्र सरकारने सिंचनासाठी राज्याला दिला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राज्यातील अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते  भाजपमध्ये आले आहेत. येणाऱ्या सरकारमध्ये माढ्याचा खासदार भाजपचाच असेल. आभार शहाजी पवार यांनी मानले. Pages