शेतीसाठी जल व्यवस्थापन ही काळाची गरज – डॉ. सुधीर भोंगळे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, March 23, 2019

शेतीसाठी जल व्यवस्थापन ही काळाची गरज – डॉ. सुधीर भोंगळेशेतीसाठी जल व्यवस्थापन ही काळाची गरज – डॉ. सुधीर भोंगळे 


मंगळवेढा / प्रतिनिधी


 पाण्याबाबत बेजबाबदारपणाची भूमिका भविष्यासाठी अत्यंत घातक असून, पाणी मुबलक असल्याचा समज चुकीचा आहे. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतीसाठी जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. नियोजनाच्या अभावामुळेच पाणी वापरात असमतोल होतो. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब केला पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केले.

धनश्री परिवाराच्यावतीने मंगळवेढा येथे शनिवार दि. २३ मार्च रोजी सायं ६ वा. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे तालुक्यातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा तसेच यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून विविध पदावर नियुक्त झालेल्या गुणवंतांच्या गौरवार्थ त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर संरक्षित पाणी साठवणुक व पिकांना काटेकोर पाणी व्यवस्थापन याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. भोंगळे बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव होते. व्यासपीठावर त्रिंबक कोंडुभैरी, प्रा. शिवाजीराव काळुंगे, भुंजगराव पाटील, यादापा माळी, प्रभाकर कलुबर्मे, उमाकांत कलशेट्टी, अंकुश पडवळे आदीजण उपस्थित होते.


पुढे बोलताना डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले, ७५० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पाण्याचे महत्त्व विशद केले; मात्र आजही आपल्याला पाण्याचे मूल्य कळत नाही. पाणी या मूलभूत घटकामुळेच राष्ट्राची प्रगती होते. पाण्याची उपलब्धता, गरज व वापर याचा ताळमेळ तंत्रशुद्ध रीतीने घातला पाहिजे. पर्जन्यमानाची सरासरी स्थिर राहिली आहे; मात्र उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थापनात असलेल्या त्रुटी व नियोजनातील चुका यामुळे पाण्याचा सतत अपव्यय होतो. तज्ज्ञांचे संशोधन व समोर आलेल्या सिद्धांतावरून राज्यातील बहतांश शेतजमीन कोरडी राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रत्येक गावाने पाणलोटाचे काम लोकश्रमदानाच्या माध्यमातून हाती घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हे काम डोळे उघडे ठेऊन व शास्त्रशुध्दरितीने करणे गरजेचे आहे. नुसते जमिनीला खड्डे काढून, नाले उभे, आडवे घेतले म्हणजे पाणलोटचे काम होत नाही. पाण्याचे महत्व ओळखून घराघरात आता पाण्याचा ताळेबंद मांडता आला पाहिजे. आपल्याकडे पाणी फुकट मिळते अशी अद्याप सर्वांची भावना बनल्याने पाण्याचा बेसुमार व बेफिकीरीने वापर होताना दिसत आहे. दुष्काळाग्रस्त भागात ऊसासारखे पिकाला पाठाने पाणी देऊन आपण कित्येक लीटर पाणी वाया घालवतोय याची अद्याप आपल्याला जाणिव नाही. इस्त्रायल सारख्या देशात पावसाचे प्रमाण आपल्यापेक्षा कितीतरी पटीने कमी असून देखील ते पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करत आहेत. म्हणूण ते आज प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकले. आपण पाण्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे. पाण्याने अग्नीचे शमन होत असते पण मानवाच्या बेफिकीरीने एक दिवस आग्नीशमन करणार्‍या पाण्याचाच भडका होऊन संपूर्ण मानवजात भस्मसात होण्याची शक्यता आहे. 

सरकारी अनास्थेमुळे पाणलोट क्षेत्र विकास खोळंबला आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हे तंत्र अशास्त्रीय असून 'माती अडवा, पाणी जिरवा' या तंत्राचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत भोंगळे यांनी व्यक्त केले. कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे ७० टीएमसी पाणी समाजाच्या फुकटय़ा स्वभावामुळे वाया जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारच्या अखत्यारित असणारी पाण्याची मालकी केंद्र सरकारकडे गेल्याशिवाय राज्य सरकारला जलसंधारणाचे महत्त्व उमगणार नाही.

हवामानाला पूरक ठरणारे पीक उत्पादन करण्यावर अधिक भर दिल्यास कमी पाण्यात जास्त उत्पादन करणे शक्य होईल. त्यासाठी शेती, सिंचनासाठी पाण्याचा अतिरिक्त होणारा वापर रोखून प्राप्त हवामानाला अनुकूल पीक पद्धती स्वीकारण्याची गरज आहे. जगामधे शेती उत्पादकतेचे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरीत्या केले जात आहेत. प्रयोगशील शेती लागवड, पाणी बचतीचे उपाय मोठ्या प्रमाणात राबवण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग सुरू असून आधुनिक शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मितीचे सामर्थ्य आहे, 

जागतिक बाजारपेठेत खतांचा अतिवापर असलेल्या शेतमालाला ग्राहक मिळत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी प्रयोगाची कास धरली आहे. मात्र आपण  केलेल्या प्रयोगाची माहिती शेतकरी मनमोकळेपणाने देत नाहीत, अशीही खंत सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केली. शेतीसाठी केलेला प्रयोग आणि तो करताना आलेला अनुभव याचे शेतकऱ्यांनी परस्परांमध्ये आदानप्रदान करायला हवे, असे आवाहनही सुधीर भोंगळे यांनी केले.

रोजगाराच्या निमित्ताने शहरांमध्ये डेरेदाखल झालेल्या तरुणांनी महात्मा गांधीजींनी दिलेला कानमंत्र जपत पुन्हा गावची वाट धरायला हवी. केवळ उपजीविकेसाठी शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांना अत्यंत ताणतणावात आणि अनेकदा निकृष्ट वातावरणात राहावे लागते. अशा लोकांना पुन्हा गावाकडे शेतीवर आधारित चांगले जीवन जगता येऊ शकते असेही डॉ. भोंगळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र शासन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त अंकुश पडवळे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विरेंद्र राक्षे, महाराष्ट्र शासन कृषीसेवारत्न पुरस्कार प्राप्त रामचंद्र आलदर, पुणे विभागीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्राप्त राकेश गायकवाड, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचे तर्फे उपक्रमशील शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उषा कोष्टी यांचेसह केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यश प्राप्त केलेले बावची येथील वनसेवा अधिकारी श्रीकांत खांडेकर, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विनायक जगताप व मंदोदरी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, १६ वी राष्ट्रीय ज्युनियर अथेलेटिक्समधील रौप्यपदक विजेती श्रद्धा हाके, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर भगरे,

साने गुरुजी कथामाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक कलुबर्मे, मारूती निकम, रवींद्र लोकरे, हनुमंत आसबे, काकासो पुजारी, राजेंद्र कांबळे, अरविंद बिराजदार

जनकल्याण परिवाराचा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्राप्त वारी परिवार मंगळवेढा आदी गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले. याप्रसंगी ॲड. बिराप्पा जाधव, विरेंद्र राक्षे, रामचंद्र आलदर, प्रा. विनायक कलुबर्मे व अंकुश पडवळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, डॉ. भीमाशंकर बिराजदार, धनश्री मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन युवराज गडदे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह सुहास सावंजी, सुधाकर कट्टे, युवराज सूर्यवंशी, विश्वनाथ नागणे ज्ञानेश्वर फटे, किरण सांगोलकर, विठ्ठल फटे, विक्रम जगताप, आनंदा चौधरी, हणमंत बेदरे, परमेश्वर सुर्यवंशी, ब्रह्मदेव कुंभार, विनायक लवटे, मीरा सुतार, संदीप सुर्यवंशी, किरण मेहेरकर, महेश दत्तू, नितीन शिंदे, सतीश गायकवाड, योगेश पवार, सोमनाथ सावंत, राजू सूर्यवंशी, दत्तात्रय जाधव, विकास माने, संतोष माळी, प्रकाश खराडे, श्रीकांत चोपडे, सूरज काळुंगे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कवी इंद्रजीत घुले यांनी केले.

Pages