म्हैसाळ योजनेमध्ये मंगळवेढ्यातील वगळलेल्या गावांचा समावेश होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही- आमदार तानाजी सावंत - Pantnagari Times

Breaking News

Thursday, February 28, 2019

म्हैसाळ योजनेमध्ये मंगळवेढ्यातील वगळलेल्या गावांचा समावेश होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही- आमदार तानाजी सावंतम्हैसाळ उपसा सिंचन योजनेत नव्याने सहा गावांचा समावेश

विजय शिवतारे यांचे आदेश : आ. तानाजी सावंत,  शैला गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

मंगळवेढा / प्रतिनिधी

मुंबई मंत्रालयात मंगळवेढा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या गावांचा समावेश करावा, यासाठी झालेल्या बैठकीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आ. तानाजी सावंत, कार्यकारी संचालक  खलील अन्सारी  हनुमंत गुणाले लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील,शैला गोडसे संभाजी शिंदे अधिकारी आदी. उपस्थित होते .मंगळवेढा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कमी झालेली लवंगी आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर बु।।, सलगर खु। चा पूर्व भाग व येळगी या सहा गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले असून सदरची गावे प्रकल्पात समाविष्ट करण्यासाठी  तत्वत: मान्यता दिली आहे. म्हैसाळ योजनेचा बंद पाईपलाईन कालवा  मंगळवेढा  व जत तालुक्याच्या सीमेवरून जात आहे या कालव्याच्या जत तालुक्यातील क्षेत्राचा समावेश योजनेत करण्यात आलेला आहे  परंतु दुसऱ्या बाजूला मंगळवेढ्याच्या हद्दीतील  गावांचा योजनेमध्ये समावेश नव्हता  ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ही गावे या योजनेमध्ये समाविष्ठ करावीत, अशी मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे व संबंधित गावातील शेतकऱ्यांनी  एकत्रित येऊन  लावून धरली होती. त्यावर मंत्रालयात ही विशेष बैठक घेण्यात आली.


मंगळवेढा तालुका कायम दुष्काळी व पाण्यापासून वंचित आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे १३ गावातील सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्राला  म्हैसाळ योजनेचे पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र तालुक्यातील लवंगी, आसबेवाडी,शिवनगी सोड्डी सलगर बु।। सलगर खुर्द चा पूर्व भाग, येळगी ही गावे या योजनेतून लाभक्षेत्रात असूनही वगळण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. संतप्त शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी मिळणार नसेल तर ही योजना काय कामाची, असे म्हणत या योजनेचे सुरू असलेले काम बंद पाडले होते. जोपर्यंत या योजनेत आमच्या गावांचा समावेश होत नाही, तोपर्यंत हे काम सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता.

या योजनेची उमदी शाखा कालवा हा मंगळवेढा तालुका व जत तालुक्याच्या शिवेवरून जातो. या कालव्यावर फक्त जत तालुक्यातील सर्व गावांचा समावेश प्रकल्प अहवालामध्ये केला आहे. तर मंगळवेढा तालुक्यातील तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय करत वरील सहा गावे वगळण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. हाच मुद्दा पकडत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख व झेडपी सदस्या शैला गोडसे यांनी शेतकऱ्यांच्या भावना शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांच्याकडे मांडल्या आमदार सावंत यांनी  मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांकडे सर्व पदाधिकारी व शेतकरी यांच्या समवेत बैठक घेण्याचे नियोजन केले .

शेतकºयांना या योजनेचे पाणी मिळावे, यासाठी जत तालुक्यामधील ७० गावांमधील सुमारे २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. त्यामुळे एकतरी जत तालुक्यातील सहा गावे वगळण्यात यावीत व त्याऐवजी मंगळवेढा तालुक्यातील सहा गावांचा या योजनेमध्ये नव्याने समावेश करून त्यांना पाणी देण्यात यावे, किंवा  बंद पाईपलाईन मुळे  ज्या पाण्याची बचत होते  त्या पाण्याचा उपयोग करून  मंगळवेढ्याच्या हद्दीतील  वगळलेल्या या गावांना  पाणी उपलब्ध करून द्यावे अशी ठाम भूमिका जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्यासमोर आमदार तानाजी सावंत यांनी मांडली.  हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर सहा गावातील शेतकºयांना गृहित धरून नव्याने कामे सुरू करण्याचे परत एकदा नियोजन करावे, अशी मागणीही आमदार सावंत यांनी या बैठकीत केली होती.

त्यानंतर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या बैठकीमध्येच आ. तानाजी सावंत यांची आक्रमक भूमिका व मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाºयांनी शेतकºयांविषयी असलेली तळमळ लक्षात घेता तातडीने कमी केलेल्या सहा गावांचे फेर सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करावा व त्यानंतर या सर्व गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील वगळलेल्या सहा गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या योजनेचे पाणी त्यांना आता कायमचेमिळणार हे निश्चित झाले आहे.

या बैठकीला आमदार तानाजी सावंत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री खलील अन्सारी अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले  कार्यकारी अभियंता श्री पाटील, जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना घाडी, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, संतोष माने,उपसंरपच रामचंद्र जाधव, मधुकर बनसोडे, जयवंत माने, संजय घोडके, मधुकर देशमुख, संजय नागणे,

 समाधान आसबे, रमेश आसबे, अनिल जाधव, विनोद कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

शिरनांदगी तलावात पाणी येणार

शिरनांदगी तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी यावे, यासाठी शैला गोडसे यांनी तब्बल 7 दिवस तलावातच ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळीही प्रशासनाने आश्वासने दिली. मात्र ती पाळली नाहीत. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करताच २५ मार्चपासून दुसरे रोटेशन सुरू होत आहे. तोपर्यंत तलावात पाणी येण्यासाठी अपूर्ण असणारी सर्व कामे पूर्ण करून १५ एप्रिलपर्यंत या योजनेचे पाणी शिरनांदगी तलावामध्ये सोडण्याचे आदेशही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याने शेतकºयांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

कॅनॉलची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करा व आवश्यक ते प्रमाणे पाईपलाईन ला चेबर काढण्याचे आदेश दिलेत.

नंदूर, बोराळे, डोणज, अरळी या भागातील कॅनॉलची कामे अजूनही अपूर्ण स्वरूपात आहेत. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना या योजनेचे पाणी कधी मिळणार, हे अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. हा मुद्दा या बैठकीत चर्चेला आल्यानंतर कॅनॉलची अपूर्ण असलेली कामे त्वरीत पूर्ण करून या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावरील शेतकºयांना पाणी देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश विजय शिवतारे यांनी दिले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे

गेल्या काही महिन्यापासून शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख शैला गोडसे लोकांसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यांनीच शेतकऱ्यांचा हा मुद्दा माझ्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. शेतकरी व नागरिकांसाठी शिवसेना कायम तत्पर असेल

आ. तानाजी सावंत

संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा

म्हैसाळ योजनेचे पाणी उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे या सहा गावातील शेतकऱ्यांची अवस्था झाली होती आपल्याच जमिनीतून कालवा जात आहे आणि आपलीच गावे वगळली आहेत या बाबींची कल्पना सुद्धा करता येत नाही त्यामुळे मंत्रालयात झालेल्या बैठकीचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल आणि याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचे नेते आमदार तानाजी  सावंत यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या आक्रमक आणि खंबीर भूमिकेला जाते

शैलाताई गोडसे

जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी

Pages