बीडचा लाचखोर अपर जिल्हाधिकारी एसीबीच्या सापळ्यात
बीड / प्रतिनिधी
चार वर्षापूर्वीच्या बीडमधील बहुचर्चित शासकीय धान्य घोटाळ्यातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी आणि त्याच्या बाजूने निकाल देण्यसाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील अपर जिल्हाधिकारी बाबुराव मरीबा कांबळे आणि तहसील कार्यालयातील अव्वल कारकून महादेव चांगुजी महाकुडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने रंगेहाथ पकडले. महसूल विभागातील बड्या अधिकारीच सापळ्यात अडकल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
२०१४-१५ साली बीडच्या शासकीय धान्य गोदामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता. त्यासाठी गोडाऊन किपरला दोषी ठरवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याची चौकशी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे याच्याकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणातून गोडाऊन किपरला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी कांबळेने १० लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले. या व्यवहारात मध्यस्थी म्हणून तहसीलचा अव्वल कारकून महाकुडे याचा सहभाग होता. परंतु, याबाबत ३१ जानेवारी रोजी बीड एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली.
तक्रारीची खात्री झाल्यानंतर बीड एसीबीने शनिवारी सकाळपासूनच कांबळेच्या शासकीय निवासस्थानी सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पाच लाख रुपये कांबळे आणि महाकुडे यांच्याकडे देताच दबा धरून बसलेल्या बीड एसीबीच्या पथकाने झडप घालून दोघांनाही रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने, प्रदीप वीर, भरत गारदे, सय्यद नदीम प्रवीण व टिमने केली.