सोलापूर / प्रतिनिधी
राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार महसुल मंडळाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मंजूरीने चारा छावण्या सुरु करण्याकरीता दानशुर, सेवाभावी संस्था, गोरक्षण क्षेत्रामध्ये काम करणा-या अशासकीय संस्था स्वइच्छेने व शासनाचे कोणतेही अनुदान न घेता छावण्या सुरु करण्यास इच्छुक असलेल्या संस्था आणि शासकीय अनुदानावर सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दुध खरेदी विक्री संघ, सेवाभावी संस्था, स्वयंसेवा संस्था यांच्याकडून चारा छावण्या सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

चारा छावण्यांमध्ये जनावरांचे ऊन आणि अवकाळी पावसापासुन संरक्षण करण्यासाठी निवारा शेड उभारणे आवश्यक आहे. रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि छावण्यातील दाखल जनावरांसाठी पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांची इनाफ प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक राहील. तसेच ज्या संस्थांवर चारा छावण्यामध्ये अनियमिते संदर्भात गुन्हे दाखल आहेत अशा संस्थांना चारा छावणी साठी अर्ज करु नयेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण साळुंके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे
चारा छावण्या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ०२१७/२७३१००३ येथे संपर्क साधावा