भाजपची घोषणा म्हणजे बळीराजाला गाजर बीड येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, January 9, 2019

भाजपची घोषणा म्हणजे बळीराजाला गाजर बीड येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
      बीड / प्रतिनिधी
      ------------------
 केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक नुसतेच दौऱ्यावर येऊन गेले, त्याचा काही फायदा झाला नाही. भाजपकडून घोषणांच्या नावावर नुसते बळीराजाला गाजर देण्यात येत आहे. भाजप फक्त घोषणांचे जुमले बांधत आहे, अशी सडकून टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांच्या हस्ते पासबूपालक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या. पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, सुधीर मोरे आदी नेते सोबत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''पीकविमा योजनेत साईनाथ यांनी नुकताच दावा केला होता, की राफेलपेक्षा मोठा गैरव्यवहार यात झाला आहे. नुसत्याच घोषणा करण्यात येत आहेत. पीक फसल नाही, फसवी योजना नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे विषय सोडवू शकला नाहीत. तर, राम मंदिराचा विषयही तसाच आहे. राम मंदिराबाबत पंतप्रधान म्हणतात न्यायालयाचा जो निर्णय होईल तो मान्य. त्यांनी जाहिरनाम्यात काय सांगितले होते. नुसत्या घोषणांचा जुमला सरकारकडून बांधण्यात येत आहे. आता घोषणांचा पाऊस बंद करा. ज्या घोषणा केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करा.
 गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा पारा कमालीचा घसरला आहे, पण आज पारा वाढून हवा थोडी गरम होण्याची शक्यता आहे. अर्थातच ही हवा राजकीय असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज (ता. ९)  मोदींची सभा सुरू आहे,  तर बीडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा सुरू झाली आहे. सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरून अप्रत्यक्षपणे भाजपला टोमणा मारला आहे. 'संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या' असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.

Pages