विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोजावे लागणार पैसे - Pantnagari Times

Breaking News

Sunday, January 13, 2019

विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोजावे लागणार पैसे पंढरपूर / प्रतिनिधी

---------------------

श्री विठ्ठल - रखुमाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींगसाठी यापुढे शंभर रूपये शुल्क आकारण्याचा निर्णय विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शनिवारी (दि. 12) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे वर्षभरात मंदिर समितीला सुमारे 14 कोटी रूपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.दरम्यान, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हेच या बैठकीला गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या निर्णयाची घोषणा करू नये अशी सूचना डॉ. भोसले यांनीच केल्यामुळे या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार की, हा निर्णय केवळ औट-घटकेचा ठरणार याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक शनिवारी संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे या बैठकीला गैरहजर होते त्यामुळे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली समितीची ही बैठक संपन्न झाली. यावेळी समिती सदस्या तथा नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, सदस्य संभाजीराजे शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जवंजाळ, शकुंतला नडगिरे, शिवाजीराव मोरे , मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. 

यावेळी समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी ऑनलाईन दर्शन बुकींगसाठी किमान 100 रूपये शुल्क आकारावे अशी सुचना मांडली. त्यानंतर समिती सदस्यांमध्ये सर्व बाजुनी साधक-बाधक चर्चा होऊन ऑन लाईन दर्शन बुकींगसाठी 100 रूपये फी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या दररोज 3 हजार 500 भाविकांच्या ऑनलाईन बुकींगची आणि वेळ ठरवून दर्शन देण्याची व्यवस्था आहे. मात्र या भाविकांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या दर्शनासाठी जगभरातून कुठूनही ऑन लाईन बुकींग करण्याची सोय आहे मात्र ज्या ठिकाणी बुकींग केले जाते त्याठिकाणचे सायबर कॅफे चालक भाविकांकडून नोंदणीचे पैसे घेतच असतात. वर्षभरात सुमारे 13 ते 14 लाख भाविक या सुविधेचा लाभ घेऊन विठ्ठल दर्शन घेत आहेत. ऑनलाईन बुकींग करणार्‍या भाविकांकडून बुकींगसाठी 100 रूपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले उपस्थित नव्हते, त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ होणार की अध्यक्ष भोसले यांच्या संमतीसाठी प्रलंबीत ठेवणार याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.दरवर्षी 14 लाख भाविक करतात ऑनलाईन बुकींगदररोज सरासरी 3 हजारांहून जास्त भाविकांना नोंदणी केल्याप्रमाणे दर्शन द्‍यावे लागते आहे. वर्षभरात सुमारे 13 ते 14 लाख भाविक या सुविधेचा लाभ घेऊन विठ्ठल दर्शन घेत आहेत. या भाविकांकडून प्रत्येकी 100 रूपये शुल्क आकारल्यास वर्षाला मंदिर समितीला 13 ते 14 कोटी रूपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

Pages