मंगळवेढा / प्रतिनिधी
रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराकडून ग्रामीण भागात कमी रुंदीचा रस्त्याचा अवजड वाहने नेल्याने या रस्त्याची दाणादाण उडाली. रस्ता खराब केल्यामुळे तालुक्यातील लेंडवेचिंचाळे ग्रामस्थांनी या ठेकेदाराची वाहने रोखून धरली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत सदरची 11 वाहने तहसील कार्यालयात आणली. दरम्यान तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना विचारले असता फोन स्विच ऑफ केल्यामुळे नेमकी कोणती कारवाई करणार याबाबत माहिती मिळू शकली नाही.
प्रस्तावित महामार्गाच्या कामासाठी परराज्यातील ठेकेदाराने चाळीस धोंडा व खोमनाळ रोडवर तळ बसवला. या कामासाठी लागणारी खडीचा दगड या ग्रामीण भागातून गोळा केला जात आहे. ग्रामीण भागातील रस्ते हे कमी रुंदीचे असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे अगोदरच खड्डे पडले आहे. आणि या रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास या वाहनधारकाला होत आहे.
लेंडवेचिंचाळेवरून सांगोल्याला जाणे सोयीचे आहे. हा रस्ता खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारास या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी केली असता ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चाळीसगाव येथील अवजड वाहने रोखून धरली यावेळी परमेश्वर लेंडवे, देविदास इंगोले, राजेन्द्र लेंडवे, चंद्रकात लेंडवे, कलाप्पा जाधव, सचिन लेंडवे, बबलू पाटील, प्रमोद लेंडवे, सुभाष फराटे, अक्षय लेंडवे, बापूराव लेंडवे, अशोक, भारत लेंडवे, शैलेंद्र दिघे पतंगराव लेंडवे, सिंध्देश्वर लेंडवे, बाळू पाटील, अजित लेंडवे, सचिन आदी उपस्थित होते.
दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहने तहसील कार्यालयात आणून लावली आता यात महसूल महसूल खाते दंडाची कारवाई करणार की अर्थपूर्ण सवलत देणार याकडे लेंडवेचिंचाळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे