मोदी गंभीर..उद्धव खंबीर..!
2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड येथे आपापल्या पद्धतीने निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. वास्तविक पाहता एका बाजूला देशाच्या पंतप्रधानाची सभा तर दुसर्या बाजूला देशाच्या प्रादेशिक राज्यातील एका पक्षप्रमुखांची सभा. या दोन्ही प्रचारसभापैकी साहजिकच प्रधानमंत्री यांची सभा गाजणार ही आश्वासकता महाराष्ट्रातील जनतेला असतानाच, वास्तव मात्र जरा वेगळेच घडले. ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही मोदींची सभा होती, त्या सभेला त्या जिल्ह्यातील मतदारांनीच पाठ फिरवली. केवळ सोलापूर शहरातील मतदारांनी तरी, सभेला हजेरी लावली असटी तरी, लाखोंच्या संख्येत गर्दी दिसली असती. परंतु मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, गर्दीच्या बाबतीत मोदींची सभा फोल ठरली, असा सोलापूरवासियांचा स्वर ऐकावयास मिळाला. दुसरी गोष्ट अशी की, पंतप्रधानांची सभा सोलापूरमध्ये होत आहे म्हटल्यावर, सोलापूरमध्ये आणीबाणीचे चित्र निर्माण होईल, अशी घोषणा काँग्रेसच्या स्थानिक आमदार प्रणिती शिंदे यांनी आदल्या दिवशी केली होती. आणि ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. सभेच्या दिवशी सोलापूरमधील विविध पोलिस स्टेशनमध्ये मोदींच्या विरोधात निदर्शने केली म्हणून, हजारो कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. याशिवाय ज्या निदर्शकांनी मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या, त्या सामान्य निदर्शकांना काठीने, लाथाबुक्क्यांनी आणि खाली पाडून अक्षरशा तुडवून मारताना पोलिसांमधील हिंस्त्र व अमानवीपणा तेथील हजारो लोकांनी पहिला. त्यानंतर विविध चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रासह, संबंध देशाने पाहिला. परिणामी सामान्य मतदारांच्या मनातून मोदीजी पुन्हा एकदा फोल ठरले. एवढेच नाही तर मोदींची सभा सोलापूर शहरात होत आहे म्हणून, शहरातले रस्तेही बंद केले गेले. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. विशेष म्हणजे शहरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या. एवढे सारे होऊनही प्रधानमंत्र्यांच्या एकूण बारा मिनिटांच्या भाषणात, उपस्थित मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पदरात नेमकं काय पडलं? तर सोलापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या रस्त्यांच्या विकासापलीकडे सामान्य माणसाच्या विकासाच्या कामांना प्रधानमंत्री यांनी आपल्या भाषणात स्पर्शही केला नाही. त्यामुळे मतदार मोदींना 2019 मध्ये आपला आशीर्वाद कसा देणार? म्हणून मोदींना शेवटी या गोष्टीची चाहूल लागली आणि ते गंभीर झाले.
दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा बीडमध्ये मोठ्या उत्साहात आणि लाखोंच्या गर्दीत पार पडली. या सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे दिसून आले नाही. उलट सोलापूरमधील मोदींच्या भाषणात कुठलाही आत्मविश्वास जनतेला दिसत नव्हता. पण बीडमधील उद्धवजींच्या भाषणांमध्ये मात्र प्रचंड आत्मविश्वास व जोश होता. याशिवाय मोदींनी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर, पीकविम्याच्या नुकसान भरपाईवर, सौभाग्य योजनेवर,मोदींच्या मन की बात वर इत्यादी गोष्टींचा पुराव्यासहित उद्धव ठाकरे यांनी चांगलाच फज्जा उडवला. ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या नुकसान भरपाईसाठी दहा हजार रुपये भरले, त्या शेतकऱ्यांना मोदींकडून दोन रुपये, पाच रुपये, पन्नास रुपये, शंभर रुपयेचे चेक आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखाची हेटाळणीच झाली. या गोष्टीचा उद्धव ठाकरेंनी स्टेजवरच पुराव्यासहित चांगलाच समाचार घेतला. आणि विशेष म्हणजे सोलापूरच्या भाषणात मोदीजींनी उपस्थितांनी मला आशीर्वाद (मते द्या) दया, असे अनेकदा सांगितले. तर बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी “मी जन की बात करत आहे”, असे सांगून “मी मते मागण्यासाठी आलोच नाही, प्रबोधन करण्यासाठी आलो आहे, तुम्हीच ठरवा मत द्यायचे की न द्यायचे ते.” त्यांच्यातील हा खंबीरपणा मात्र उपस्थित लाखोंच्या गर्दीला व सर्व महाराष्ट्राला मनापासून भावला. त्यामुळे सर्वांच्या मुखात एकच वाक्य ऐकायला येत होतं की, “मोदी गंभीर.. अन उद्धव खंबीर..!”.