शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा सरकारला डान्सबार महत्वाचे - खासदार राजू शेट्टी - Pantnagari Times

Breaking News

Saturday, January 19, 2019

शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा सरकारला डान्सबार महत्वाचे - खासदार राजू शेट्टी


शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा सरकारला डान्सबार महत्वाचे - खासदार राजू शेट्टी

सांगली / प्रतिनिधी

----------------------

     

      शेतकऱयांच्या प्रश्नापेक्षा सरकारला डान्सबार महत्वाचे आहेत. या सरकारला डान्सबारमध्ये वाजणारे पैंजण ऐकायचे आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच शेतकऱयांच्या प्रश्नाबाबतही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. शेतकऱ्यांना कर्ज देताना विम्याची सक्ती केल्यास बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देऊ, असा इशारा खासदार शेट्टी यांनी सांगलीत दिला.

डान्स बार बंदी आणि एफआरपीवरुन राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला. भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा डान्सबार महत्त्वाचे वाटतात, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी डान्सबार परवानगीवरुन सरकारवर टीका केली. उच्च न्यायालयाच्या परवानगीने डान्सबारवर बंदी होती. सर्वोच्च न्यायालयात डान्सबारला परवानगी मिळते. त्यामध्ये न्यायालयात भूमिका मांडण्यात सरकार कमी पडल्यामुळेच परवानगी मिळाली, असा आरोप खासदार शेट्टी यांनी राज्य सरकारवर केला.

एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय माघार नाही-

उसाच्या एफआरपीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारणानगर येथे एकरकमी एफआरपी देऊ, प्रसंगी तिजोरी खाली करू, अशी घोषणा केली होती. त्यामुळे त्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहेत? हे आम्ही कोल्हापूर दौऱ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विचारु, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे यासाठी २८ जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखर जप्तीचा आदेश नाही, तर एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका यावेळी त्यांनी जाहीर केली. 

शेतकऱ्यांना कर्ज देताना बँक अधिकाऱ्यांकडून विमा पॉलिसी सक्तीची करण्यात येत आहे. मात्र रिझर्व बँकेचा कोणताही असा नियम नाही. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विम्याची सक्ती केल्यास बँकेच्या अधिकाऱ्यांना बदडून काढू, असा इशारा यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Pages