मंगळवेढा / प्रतिनिधी
----------------------------
मंगळवेढा तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेला खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला पहाटे तीन वाजता देण्यात आला. यामुळे सदर महिलेची प्रसुती शासकीय रुग्णवाहिकेत करण्याची वेळ आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिकेचे महिला डॉक्टर आणि चालक यांनी केलेल्या मदतीचे नातेवाईकातून समाधान होत आहे.
तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथील धानम्मा स्वामी ही महिला माहेरी भाळवणी येथे आली होती. मध्यरात्रीच्या दरम्यान प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने नातेवाईक यांनी 108 या शासकीय रुग्णवाहिकेला फोन केला. भोसे येथे असलेली रुग्ण वाहिका मध्यरात्री अडीचच्या दरम्यान भाळवणी येथे येऊन सदरच्या महिलेला तातडीने मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात पहाटे तीनच्या दरम्यान दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेची प्रसूती करण्यास नकार देत बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत तात्काळ खाजगी वैद्यकीय दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी सदरच्या महिलेसह नातेवाईकांसमोर काय करायचा हा पर्याय सुचत नसताना परत खाजगी दवाखान्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान रुग्णवाहिकेतच प्रसूती होऊन मुलीचा जन्म झाला.
रुग्णवाहिकेतील महिला डाँक्टर आणि चालक यांनी प्रसंगावधान राखून सर्वतोपरी मदत केली आणि त्यानंतर अर्धा तासाने सदर महिलेला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले गेले. शासन एका बाजूला मुली वाचवा असे आवाहन करताना ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रे, आणि उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात आद्यवत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या असताना देखील कोणाच्या फायद्यासाठी हे डॉक्टर आपल्या अंगावरची जबाबदारी ढकलतात ? असा प्रश्न यामुळे उभा झाला आहे.