मंगळवेढा / प्रतिनिधी
:- फक्त नऊ वर्षाचे बाळ दिलखुलासपणानं अंगणासमोर खेळणार.... खेळता खेळता ते गायब झालं....अन् सहाव्या दिवशी सापडला तो त्याचा मृतदेह... केस कापलेले.... पाय तोडलेला.... एवढ्या एवढ्या कोवळ्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या केलेल्या काळीज कापून टाकणार हे कृत्य गावातीलच साठीकडं झुकलेला वृध्दान, केल .... कारण काय.... तर.... मागे लागलेली साडेसाती... ती सोडवण्यासाठी मती गुंग झाली आणि कुण्या एका बाबाच्या नादानं भानामती केली.... नरबळी दिला. आता साडेसाती संपेल असं वाटलं पण साडेसातीचा फेरा काही सुटला नाही. पोलीस बरोबर पोहोचले.. बेड्या ठोकल्या अन पदरात पडली पुन्हा साडेसाती.
काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना घडली आहे. भीमा नदी काठावरच्या माचनूर (ता.मंगळवेढा) येथे घडलेली. शनिवारची शाळा संपवून आल्यानंतर घरासमोरच्या अंगणात खेळता-खेळता गायब झालेल्या आणि त्यानंतर सहाव्या दिवशी छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला त्या प्रतीक मधुकर शिवशरण च्या दुर्दैवाची ही कहाणी आहे. त्याचा नरबळी दिल्याप्रकरणी नानासाहेब पिराजी डोके वय 68 या माचनुर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला मंगळवेढा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश कापुरे यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . याप्रकरणी सरकारतर्फे सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे ऍड कीर्तीपाल गायकवाड, ओंकार बुरकुल आणि आरोपीतर्फे ऍड किशोर धारूरकर यांनी काम पाहिले.
प्रतीकचा मृतदेह सापडल्यानंतर हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार हा नरबळीचा प्रकार नसून खुनाचा प्रकार असल्याचा खुलासा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केला होता. मात्र तपासामध्ये सर्व बाबी उघड झाल्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
:- नानासाहेब गावातील बडी असामी
आरोपी नानासाहेब डोके हा मंगळवेढा येथील दामाजी सहकारी साखर कारखान्याचा माजी संचालक आहे. शिवाय माचनुर येथील सिध्दसारण संघाचे अध्यक्षपदही त्याच्याकडेच आहे. नानासाहेब तसा गावातील वजनदार आणि बडी असामी म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांची नेहमीच उठबस असते. त्यामुळे आता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
:- साडेसातीमुळे गुंग झाली मती
स्वतः नानासाहेबाला अर्धांगवायूचा त्रास आहे. त्याचा मुलगा राजेंद्र याला पेफर्याच्या रोगाने त्रस्त आहे. नानासाहेबाची पत्नी सुधामतीला स्मृतिभ्रंश झाला आहे. नानासाहेबाला एक विवाहित मुलगी आहे. तिचा वारंवार गर्भपात होतो. त्यामुळे तिला अपत्य प्राप्ती होईल अशी झाली आहे. संपूर्ण कुटुंबालाच लागलेली साडेसाती काढण्यासाठी कोण्या एका बाबाने नरबळी देण्याचा उपाय सुचवला. त्यातून साडेसाती संपली नाही, उलट पोलीस आणि कोर्टकचेरीची नवी साडेसाती सुरू झाली.
:- भैय्या देशमुखांचा 24 दिवस ठिय्या
प्रतीक शिवशरण च्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या कार्यालयासमोर तब्बल 24 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यांची दिवाळी आंदोलनातच गेली होती भारत शिवशरण याला अटक केल्यानंतरच त्यांनी आंदोलन थांबवले होते.
:- प्रतीकच्या चुलत्याची घेतली मदत
नरबळी शिवाय साडेसाती मधून सुटका नाही. म्हणून नरबळीसाठी प्रतीकला हेरले. त्याला गोड बोलून घेऊन येण्यासाठी एक अल्पवयीन मुलाला सांगितले. प्रतीक नरबळीच्या नियोजित जागेत पोहोचल्यानंतर नानासाहेबाने प्रतीक चा चुलता भारत शिवशरण यांच्या मदतीने प्रतीचे काम तमाम केले. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी यापूर्वीच अल्पवयीन मुलगा आणि भारत शिवशरण यांना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तो मुलगा सुधार ग्रहाची तर भारत जेलची हवा खात आहे.
:- पोलिसांनी केला 23 तास उशीर
प्रतीक संध्याकाळी गायब झाल्यानंतर रात्री लगेच प्रतिक चे आई वडील, चुलते जनार्दन शिवशरण मंगळवेढा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी दाद घेतली नाही. पालकमंत्री, विजयकुमार देशमुख आमदार.भारत भालके, समाधान अवताडे यांनी पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना संपर्क साधल्यानंतर म्हणजे 23 तासांनी गुन्हा दाखल झाला. तपासी अंमलदार रजेवर गेल्यामुळे हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्याकडे सोपवण्यात आला.
:- पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांची बदली
या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास मंगळवेढ्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तब्बल 23 तास उशीर लावला होता. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मृत प्रतीचे नातेवाईक, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख व विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांची मंगळवेढा पोलिस ठाण्यातून बदली करण्यात आली होती.