नंदेश्वर येथे मंगळवेढा तालुक्यातील पहिला टँकर सुरू
मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था अतिशय गंभीर बनत चालली आहे. विशेषता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न भयावह होत चालला आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यासंदर्भात नागरिकांकडून मागणी होत आहे. नंदेश्वरमध्ये वाड्या-वस्त्यांवर टँकरची मागणी होत होती. यावर ग्रामपंचायत पाठपुरावा केल्याने नंदेश्वर येथे वाड्या-वस्त्यांसाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. चोवीस हजार लिटरच्या दोन खेपा मिळून रोज 48 हजार लिटर पाणी नंदेश्वर गावाला टँकरद्वारे मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महिलांनी हळदी कुंकू वाहुन पहिल्या टँकरची पूजा केली. यावेळी भारत गरंडे, मुकादम संघटना तालुकाध्यक्ष दामाजी बंडगर, माजी उपसरपंच पप्पू कळकुंबे,शशिकांत गरंडे,अनिल कळकुंबे, आण्णा लवटे हे उपस्थित होते.